करमाड : घारेगाव प्रिंपी येथील गावाजवळील सुखना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. सोहेल शफीक चाऊस (वय २० रा.घारेगाव प्रिपी ता.जि.औरंगाबाद), असे सुखना नदीच्या पाण्यात बुडून मृत युवकांचे नाव आहे.
औरंगाबाद तालुक्यातील प्रिंपीराजापासून चार कि.मी अंतरावर असलेल्या घारेगाव प्रिंपी येथील सोहेल शफीक चाऊस व त्यांच्या घरी पाहुणा आलेल्या नातेवाईकांच्या मुलाला फईम हतीम शेख हे दोघे रविवारी २० सप्टेंबर रोजी पोहण्यासाठी सुखना नदीकाठी गेले; मात्र नदीपात्रातील पाण्याच्या जोर वाहत असल्याने सोहेल चाऊस याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो त्या पाण्यात बुडाला. त्याचा सहकारी पाहुणा आलेल्या मुलाला सोहेल चाऊस दिसेना म्हणून त्याला बुडाल्याचे लक्षात येताच, त्याने आरडाओरड केली. त्यानंतर गावांतील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन युवकांचा पाण्यात उतरून शोध सुरू केला. घारेगाव ते कोळघरपर्यंत शोध घेतला, पण तरीही तो कोठेही आढळला नाही. करमाड पोलिस व अग्निशमन दलास संपर्क साधून बोलविण्यात आले. त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन दुपारी दोनपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. पण त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चाऊस कुटुंबातील महिला घटनास्थळी गेल्या असता, त्यांना सोहेलचा मृतदेह पाण्याचा तरंगताना दिसला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला होते. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनंतर घारेगाव प्रिंपी येथे शोकाकुल वातावरणात दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. सदर घटनेची करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.