‘समृद्धी महामार्गा’च्या पुलाचे काम करताना कामगार पडून गंभीर जखमी
३० फूट उंचीवरून खाली पडून हाता- पायास,आणि डोक्यात मार लागल्याने गंभीर
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा गावाजवळील करमाड-लाडसावंगी रस्त्यावर ३० फूट उंच काम सुरू असलेल्या पुलाच्या कामावरून एक कामगार खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुनील कुमार राम (वय २४ रा.झारखंड जिल्हा गडवा) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांतून जात असलेल्या समृद्धी महामार्गच्या कामासाठी हजारो कामगार काम करत आहेत. भांबर्डा, ता.औरंगाबाद येथील गावाजवळ करमाड-लाडसावंगी रस्त्यावरील पुलाचे सेंट्रींग भरण्याचे काम सुरू आहे. हे काम करत असताना शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी साडेअकरा वाजता सुनील कुमार राम (वय २४ रा.झारखंड राज्य जिल्हा गडवा) हा अचानकपणे ३० फूट उंचीवरून खाली पडून हात,पाय,आणि डोक्यात मार लागल्याने गंभीर जखमी झाला. या ठिकाणी घटनेच्या दुसऱ्या बाजूला लोखंडी पोल, मोठ मोठे दगड होते. सुदैवाने हा मोकळ्या जागेत पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी कामगाराला सोबतच्या कामगारांनी ठेकेदाराला संपर्क साधून त्यास औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी मेघा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि कंपनीच्या वतीने नेमण्यात आलेल्या ठेकेदारा मार्फत २० ते २५ कामगार या साईडवर काम करत होते. हे कामगार लॉकडाऊन नंतर झारखंड राज्यातील गडवा जिल्ह्यातील काम करण्यासाठी आले होते. यातून दोन पैसे मिळवून कुटूंबाला आधार मिळावा म्हणून तरुण या कामासाठी ३० ते ४० फूट उंचीवर जाऊन जिवाची पर्वा न करता काम करतात. मात्र या कामगारांच्या आरोग्य सुरक्षा व्यवस्था म्हणून लागणाऱ्या सुविधा संबंधित ठेकेदाराने पुरविल्या नसल्याने कामगार गंभीर जखमी झाल्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेनंतर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि कंपनी संबंधित ठेकेदारास सूचना करून कामगारांना सुरक्षा संच देईल, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.