वीजबिलाचा सामान्यांना ‘शॉक’, ठाकरे सरकार देणार दिलासा? मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

वडेट्टीवारांच्या वकत्व्यामुळे वीजबिल कमी होण्याच्या सामान्य जनतेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित

0

मुंबई : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली.

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढीव वीजबिलाच्या समस्येवर तोडगा काढून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  लॉकडाऊनच्या काळात घरगुती ग्राहक आणि कार्यालयांना वीजेची भरमसाठ बिले आली होती. यावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर वाढीव वीजबिलांमध्ये सवलत दिली जाईल, अशी भूमिका सुरुवातीला राज्य सरकारने घेतली होती. मात्र, त्यानंतर काहीही ठोस हालचाली घडताना दिसत नव्हत्या. अशातच मंगळवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे सांगत हात झटकले होते. लॉकडाऊनमध्ये आलेली बिले भरली पाहिजेत. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीजबिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे सरकराच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या सामान्य ग्राहकांना मोठा ‘शॉक’ बसला होता. नितीन राऊत यांच्या या वक्तव्यानंतर वाढीव वीजबिलांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. यानंतर माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली होती.
अशातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वीजबिलाच्या समस्येवर फेरविचार होईल, असे सांगून गोंधळ आणखीनच वाढवला होता. लोकांवर अन्याय झाला असेल तर चर्चा होणे आवश्यक आहे. ऊर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. त्यामुळे वीजबिल कमी होण्याच्या सामान्य जनतेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिलाच्या समस्येवर तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.