पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कुटुंबातील तणावाचे वातावरण स्वातंत्र्यदिनी निवळणार ?
सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता
बारामती : अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी पार्थ यांची समजूत काढली जाण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे कुटुंबात निर्माण झालेले तणावाचे वातावरण स्वातंत्र्यदिनी निवळण्याची शक्यता आहे.
कण्हेरीतील सहयोग सोसायटीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांची भेट घेतली. श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन होणार आहे. यावेळी काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार पार्थ यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबातील आजोबा आणि नातवामधील वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार आणि आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नानंतर आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे बोलले जाते. पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी पार्थ चर्चा करण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटले होते. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असेही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. शरद पवार यांनी पार्थ पवारांचे कान जाहीररित्या टोचल्यानंतर अजित पवार आणि पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही. पवार कुटुंबात वाद सुरू असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना 13 ऑगस्टच्या सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’मधील पवारांच्या निवासस्थानी बोलावले होते. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली होती. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.