सत्तास्थापनेच्या ‘जुगाडा’साठी काँग्रेस-राजदसोबत जाणार का? मांझींचा मोठा निर्णय

चार सदस्यीय विधिमंडळ पक्षाचे नेते (हम) सेक्युलरचे प्रमुख जीतन राम मांझी

0

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आपला पक्ष ‘हिंदुस्थानी आवाम मोर्चा’ (हम) एनडीएसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जेडीयू नेते नितीश कुमार  यांनाच आमचे समर्थन असून यापुढेही ते कायम राहील, असे मांझींनी स्पष्ट केले.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मांझींच्या पक्षाला कांग्रेस-राजद महागठबंधनने सोबत येण्याची ऑफर दिल्याचे वृत्त होते. याआधी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) सेक्युलरचे प्रमुख जीतन राम मांझी यांना गुरुवारी चार सदस्यीय विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर मांझींनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना राज्याच्या प्रगतीसाठी एनडीएमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिले. “वैयक्तिकरित्या मी सांगतो, की काँग्रेसच्या आमदारांनी नितीश कुमार यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना समर्थन दिले पाहिजे”, असं मांझी म्हणाले होते. काँग्रेस-राजद यांच्या महागठबंधनकडून जीतन राम मांझी यांच्या ‘हम’ तसेच मुकेश साहनी यांच्या ‘व्हीआयपी’ पक्षाला एनडीएची साथ सोडून महागठबंधनमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला जाईल, जेणेकरुन महागठबंधनला सत्तास्थापनेचा ‘जुगाड’ करता येईल, अशी अटकळ होती. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला. यासह त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 122 चा बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. त्यामुळे एनडीएचेच सरकार स्थापन होणार अशीच शक्यता आहे. मात्र, त्यात राजद-काँग्रेसच्या हालचालींनी राजकारण तापले आहे. राजदच्या नेतृत्वातील महागठबंधनला 110 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी दोन्हींच्या मतांच्या टक्केवारीत फार कमी फरक आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनचं सरकार बनता बनता राहिल्याचे बोलले जाते.

जीतन राम मांझी यांनी 1980 मध्ये काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरु केला. तिथून आधी ते राजद आणि नंतर जेडीयूमध्ये गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा दारुण पराभव झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांझींना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली. नितीश कुमार यांना पदावर परत आणण्यासाठी मांझींना जेडीयूतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर मांझींनी ‘हिंदुस्थानी आवाम मोर्चा सेक्युलर’ पक्षाची स्थापना केली. बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या आधी ते विरोधीपक्षांच्या महागठबंधनमध्ये होते. मात्र महागठबंधन समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी पूर्ण न झाल्याने मांझी यांनी निवडणुकीपूर्वी एनडीएत प्रवेश केला. जेडीयूने एनडीएत जागा वाटपाच्या अंतर्गत असलेल्या 122 जागांपैकी ‘हम’ला सात जागा दिल्या, त्यापैकी त्यांच्या पक्षाने चार जागा जिंकल्या. मांझी म्हणाले की, एकदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर ते आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात असलेल्या नव्या सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.