धनंजय मुंडेंचे मंत्रिपद जाणार की राहणार?, ‘राष्ट्रवादी’च्या उद्याच्या बैठकीत…
पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या बैठक, त्या बैठकीतच धनंजय मुंडेंचे ठरणार भवितव्य
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा यांनी बलात्कारासारखे गंभीर आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. धनंजय मुंडेंवर झालेल्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ठाम भूमिका घेतली.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एक बैठक झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला गेले. ‘सिल्व्हर ओक’वरती शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल चर्चा झाली आहे. त्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीतच धनंजय मुंडेंचे भवितव्य ठरणार आहे.अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील प्रफुल्ल पटेल शरद पवार यांना दिला, विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारास उपस्थित राहून जनतेच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याचे आश्वासन दिले, पण धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे आता नेमके काय होणार हे येत्या काळातच समजणार आहे.
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केले जात होते : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप गंभीर आहेत. याबाबत पक्षात चर्चा होत आहे. पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पोलिस पोलिसांचे काम करतील,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती. धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केले जात होते. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्याबाबत पोलिस जे निष्कर्ष काढतील, त्यानंतर आपण अंतिम निष्कर्ष काढला पाहिजे. त्यापूर्वी आपण कोणीही निष्कर्ष काढण्याची घाई करण्याची गरज नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले होते.
पक्षप्रमुख म्हणून योग्य निर्णय घेऊ : शरद पवार
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली. मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी जोर धरू लागली. यावर बोलताना पक्षाशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी म्हटले. पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू,” असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या पक्षनेत्यांची आज (14 जानेवारी) बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि धनंजय मुंडे या दोन प्रकरणांवर रोखठोक भाष्य केले.