महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता असताना औरंगाबादचे नामांतर रखडले का?

महापालिका निवडणुका आल्या काही महिन्यांवर; पुन्हा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरू

0

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचे सरकार राज्यात होते तरीही या दोन शहराचे नामांतर होऊ शकले नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना  झाला सुरू.

औरंगाबादचे नामांतर व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे तर भाजपनेही शिवसेनेच्या सुरात सूर मिळवला. पण राज्यात गेल्यावेळी भाजपचे सरकार असताना नामांतर का केले नाही, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. पण भाजपने याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा औरंगाबाद महापालिकेकडे म्हणजेच शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलवला. ‘गेल्या सरकारच्या काळात म्हणजेच फडणवीस सरकारच्या दरम्यान नामांतराचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला नाही. त्यामुळे नामांतर झाले नाही’, असे भाजपचे आमदार राम कदम यांनी सांगितले. आणि निवडणूक डोळ्यासमोर राजकारण केले जात असल्याची टीका केली. काय आहे नामांतराचा प्रश्न? : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेने ठराव घेतला. युतीच्या तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचना काढली. पण प्रकरण न्यायालयात गेले. नंतर निकाली निघाले. दरम्यानच्या काळात युतीची राज्यातून सत्ता गेली. त्यामुळे तेव्हा नामांतर बारगळले.
अनिता घोडेले शिवसेनेच्या महापौर असताना 4 जानेवारी 2011 मध्ये महापालिकेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. मध्यंतरी दिल्लीत औरंगजेब मार्गाचे नामांतर एपीजे अब्दुल कलाम करण्यात आले. त्यावेळी पुन्हा नामांतराचा मुद्दा निघाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यूपीतील काही शहरांची नावे बदलल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा झाली. पण पुढे काहीही झाले नाही. खरंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असताना नामांतर करणे शक्य होते. पण भाजप आणि शिवसेनेच्या श्रेयवाद आणि टोलवा-टोलवीच्या राजकारणामुळे औरंगाबादचे नामांतर काही झाले नाही. आता कुठल्याही क्षणी पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरचा मुद्दा ऐरणीवर आला. आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागतो की महापालिका निवडणुकीनंतर बासनात जातो हे पाहावे लागेल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.