बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का? – बाळासाहेब थोरात

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष, आज राज्यभरात सत्याग्रह

0

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाथरसच्या घटनेवर मूग गिळून गप्प का? असा थेट सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली; पण भाजपच्या योगी सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून आज  सोमवार 5 ऑक्टोबर रोजी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे.

हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली; पण भाजपच्या योगी सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी सोमवार 5 ऑक्टोबर रोजी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात थोरात म्हणाले की, भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार आहोत असे थोरात म्हणाले. हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला? उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली? पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या? आणि जाळलेला मृतदेह पीडितेचाच होता, यावर विश्वास कसा ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तरे योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील. मुख्यमंत्री योगी यांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संताप व्यक्त केला. शेवटी भानावर आलेल्या युपी सरकारने राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. पण जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत मस्तवाल पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे, हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे थोरात म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.