हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण?

नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता

0

नागपूर : राज्यातील 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपकडून यंदा विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी नवा चेहरा दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सध्या भाजपमधून महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. जोशी यांनी निवडणुकीची तयारी केल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. गेल्या 5 वर्षांपासून वंजारी पदवीधर निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अनिल सोले हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर महापौर संदीप जोशी यांनी यापूर्वीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्षाने त्यांना संकेत दिल्यामुळेच त्यांनी ही घोषणा केल्याचे कार्यकर्ते सांगतात. तर विद्यमान आमदार अनिल सोले यांचे कार्यकर्तेही कामाला लागलेले पाहायला मिळतात. प्रत्यक्ष गाठीभेटींवर सोले यांनी भर दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.