विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? यावरून सत्तास्थापनेपूर्वीच्या बैठकीत शाब्दिक चकमक

शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

0

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या कार्यवाहीतील मोठे गौप्यस्फोट केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरात राऊतांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.
मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार आणि अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता. नेहरू सेंटरमधील ठिणगी असे एखादे सरकार येईल, असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार आणि माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे, असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा 170 आहे,’’ असे मी सांगितले. त्या 170 आकडय़ांची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते, असेही राऊत म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधील 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये, अशी भूमिका खर्गे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खर्गे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी आणि प्रफुल्ल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खर्गे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला.यानंतर अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले.

अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळय़ात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ‘‘तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.’’ मी त्याक्षणीही सांगितले, ‘‘चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.’’ असा दुसरा गौप्यस्फोटही राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेची लढाई झाली. त्यास 28 नोव्हेंबरला एक वर्ष झाले. हे सरकार टिकणार नाही, असे पहिल्याच दिवशी ज्यांना वाटले ते वर्षपूर्तीनंतरही सरकार पाडायचे प्रयोग करीत आहेत. सरकार तीन पक्षांचे आहे. त्यात नाराजी आहे, पण तरीही ते टिकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकडय़ा तलवारीची लढाई होती, असे संजय राऊत म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.