शिवजयंतीवर बंधने घालायला ही काय मोगलाई आहे काय?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना ते शिवजयंतीच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर जोरदार टीका

0

नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना ते शिवजयंतीच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनाच्या काळात जनतेच्या पाठिशी उभे राहायचे सोडून या सरकारने 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी नोटिसा बाजवल्या. आता तर शिवजयंतीवर बंधनही घातली गेली. ही मोगलाई आहे काय? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचा कार्यक्रम करायचा म्हटले तर राज्यात 144 कलम लावले जाते. राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. मग शिवरायांच्या कार्यक्रमांवरच बंदी का? असा सवालही त्यांनी केला. नागरिक सर्व काळजी घेऊन शिवजयंती साजरी करत असतात. आम्हीही शिवजयंती साजरी करत राहू, असे सांगतानाच कोरोनात जनतेच्या पाठिशी उभे राहणे सोडून 75 लाख लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटिसा बजावल्या जातात. शिवजयंतीवर बंधने आणली जातात. ही काय मोगलाई आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.

अधिवेशन वादळी होणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी येत्या 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बोलत होते. आगामी अधिवेशनात वीज कनेक्शनसह अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत. या मुद्द्यांवर सरकारला घेरले जाईल, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन वादळी होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच अधिवेशनाचा कालावधी गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. जर या सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला तर सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे, असा त्याचा अर्थ होईल, असं सांगतानाच अधिवशेन किमान चार आठवड्याचे असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार प्रकरणावर नंतर उत्तर देऊ

राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात सहकार विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट कळले. याबाबत न्यायालयात अहवाल सादर झाला आहे. न्यायालयाने याविषयी काही निर्णय दिला नाही. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. अॅड. असीम सरोदे यांनी याचिका सादर करावी. त्यानंतर उत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले.

काँग्रेस जनतेला मूर्ख समजते काय?

यावेळी त्यांनी वीज माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेस सत्तेत आहे. नाना पटोले सत्ता पक्षात राहून विरोधी पक्ष असल्यासारखी मजा घेत आहेत. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठामपणे भूमिका घ्यायला हवी. हे जनतेला मूर्ख समजत आहेत का? असा सवाल करतानाच जनतेला सर्व समजत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारने आपले कर कमी केले तर इंधन दरवाढ कमी होईल, आम्ही हे केले होते. पण महाविकास आघाडी सरकार मुद्दामहून कर कमी करत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.