आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही; सोलापूरचे ग्रामस्थ आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोलावले बोरी नदीच्या पुलावर, ग्रामस्थांची त्यांनी गावात येण्याची मागणी

0

सोलापूर : सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागणा  आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे सांगवी खुर्द गावातील ग्रामस्थांची भेट घेणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी लोकांनी गावाबाहेरील बोरी नदीवरील पुलावर यावे, असे प्रशासनाकडून सांगितले. गावकऱ्यांनी याला ठाम विरोध केला. आम्ही गावाबाहेर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही, असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे. गावाबाहेरच्या नदीच्या पुलावरून मुख्यमंत्र्यांना गावातील घरांचे आणि शेतीचे झालेले नुकसान कसे दिसणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

सोलापूरमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सांगवी खुर्द गावाच्या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. या चिखलात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या अडकू शकतात. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी गावकऱ्यांना बोरी नदीच्या पुलावर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटावे, असे सांगण्यात आले. मात्र, अनेक ग्रामस्थ यासाठी राजी झालेले नाहीत. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली. यानंतर काही ग्रामस्थ गावाबाहेरच्या रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यास तयार झाले. गावाबाहेर जमलेल्या गावकऱ्यांच्या हातात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली पिके होती. मुख्यमंत्री आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपापली निवेदने दिली. मुख्यमंत्र्यांकडून घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना नुकसानभरपाईच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे बोरी नदीच्या पुलावर जाऊन तेथील नुकसानीची पाहणी करतील. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषीमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.