आत्मदहनाचा इशारा : प्रशासनाने दखल न घेतल्याने पाटबंधारे विभागात शेतकऱ्याने घेतले जाळून

शेतकऱ्याने दिला होता आत्मदहनाचा इशारा; जखमी अवस्थेत उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल

0

बीड : पाली (ता. बीड) येथील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र,जमीन संपादन प्रकरणात पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने थेट  प्रशासनाकडून दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आंदोलक शेतकऱ्याने मंगळवारी (दि.24) दुपारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात स्वत: अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले.

पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके यांची जमीन पाटबंधारे विभागामार्फत संपादित केली आहे. दरम्यान, अर्जून साळुंके याच्या संपादित जमिनीचा एकत्रीकरणाचा वाद आहे. संपादित जमिनीबाबत अर्जुन साळुंके अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत पाटबंधारे विभागाचे उंबरे झिजवत आहेत. संपादित जमिनीच्या संदर्भात तोडगा काढून न्याय मिळविण्यासाठी चकरा मारणाऱ्या अर्जुन साळुंके यांनी मागील महिन्यात पांटबंधारे विभागास आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याच्या नैराश्येने अर्जुन साळुंके यांनी मंगळवारी (दि. 24) दुपारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातच आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने कार्यालयीन कामकाजात व्यस्त असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कामासाठी आलेल्या नागरिकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. न्यायाच्या प्रतीक्षेत पेटवून घेतलेल्या अर्जुन साळुंके यांना जखमी अवस्थेत पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.