पंढरपूरची चारही बाजूंनी नाकाबंदी! 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान विठ्ठल-रखुमाईचे मुखदर्शन बंद

मात्र कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंंत्री अजितदादा पवार पंढरपूरला जाणार

0

पंढरपूर : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. पंढरपूरमध्ये चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये ही नाकाबंदी असणार आहे. कार्तिकी यात्रा गावोगावी साजरा करण्याचे सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे.
अन्य जिल्ह्यांतील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये, यासाठी पंढपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सध्या सुरू करण्यात आलेले मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील सहा विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद असलेले मुखदर्शन पुन्हा 28 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीने दिली. कार्तिकी एकादशीला राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी केली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचे आज स्पष्ट केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.