ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काळाच्या पडद्याआड
कोविड न्यूमोनियामुळे मालवली त्यांची प्राणज्योत
औरंगाबाद : मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. सातार्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयात येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कोविड न्यूमोनियामुळे त्यांची प्राणज्योत पहाटे 4 वाजता मालवली.
आशालता या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. मात्र या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर पाच दिवस सातार्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेले पाच दिवस त्या सातार्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयामधील कोविड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.