ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचे निधन
प्रदीर्घ काळापासून आजारी असल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलते चलते’, या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता विशाल आनंद यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते प्रदीर्घ काळापासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भीष्मम कोहली असे त्यांचं खरे नाव. ते जवळपास ११ हिंदी चित्रपटांतून झळकले होते. ‘चलते चलते’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. अभिनेता म्हणून या कलाविश्वात योगदान देण्यासोबतच त्यांनी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही योगदान दिले आहे. विशाल आनंद यांना वेगळी ओळख देणाऱ्या ‘चलते चलते’ या चित्रपटातून त्यांनी सिमी गरेवाल, नाझनीन आणि श्रीराम लागू या कलाकारांसह स्क्रीन शेअर केली होती. सुंदर दर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. तर, खुद्द आनंद यांनीच चित्रपटाची निर्मिती केली होती.