शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची टीका

0

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी टीका केली. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

भाजपने सुरू केलेले मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरे सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरे उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावरही प्रतिक्रिया केली. राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचे पालन होते की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिले, त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असे सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, भाजपने सुरू केलेल्या मंदिर आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असे सांगतानाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम असून सध्या राज्यात या दोन्ही पक्षांत सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.