‘सेरो’ सर्वेक्षणासाठी घाटीने सहकार्य करावे !
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांची विनंती
औरंगाबाद : येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाने टप्प्याटप्प्याने औरंगाबादसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत सिरो सर्वेक्षणाचे प्रशिक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी सहकार्य करावे. त्यासंदर्भात भारतीय जैन संघटनेतर्फे सर्वोतपरी मदत केली जाईल. त्यासाठी शासन आणि प्रशासनालाही सोबत घेतले जाईल, अशी विनंती भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे केली.
यावेळी जनऔषध व वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित, मायक्रोबायोलॉजी विभागप्रुख डॉ. ज्योती बजाज, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सय्यद मुजीब, डॉ. स्मिता अंदूरकर, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख ॲड. गौतम संचेती, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण पारख, पारस जैन, मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोरडिया, जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी, राहुल झांबड, प्रकाश कोचेटा, अमित काला आणि अभिजित हिरप यांची प्रमुख उपस्थिती होती. मुथा म्हणाले, की औरंगाबाद एकमेव असा जिल्हा आहे, जेथे कोरोनासंदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्रित काम करत आहे. अँटीजन टेस्ट, सेरो सर्वेक्षण आणि प्लाझ्मादान तिन्ही पातळ्यांवर युद्ध लढले जात आहे. सेरो सर्वेक्षणसंदर्भात औरंगाबादमध्ये सर्वोत्तम काम सुरू असून या मॉडेलचे राज्यात अनुकरण केले जाऊ शकते. त्यासाठी लागणारी यंत्रणा पुरविण्याची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना पुढाकार घेण्यास तयार आहे. त्यावर घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सांगितले की, आपण प्रस्ताव द्यावा. आम्ही तो पुढे पाठवू. कोरोनाशी लढा देण्याकरिता आमच्या संशोधनाचा व मॉडेलचा उपयोग होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. औरंगाबाद महापालिका आयुक्त तथा प्रशासन आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या दालनात झालेल्या बैठकीत भारतीय जैन संघटना आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्याशिवाय महापालिकेच्या खांद्याला खांदा लावून जे काही काम करावयाचे असेल त्यासाठी भारतीय जैन संघटना सहकार्य करण्यास तयार असल्याचे श्री. मुथा यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त श्री. पाण्डेय यांनी कोरोनाशी लढण्याकरिता करण्यात येणाऱ्या रुपरेषेबद्दल चर्चा केली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.