उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार, उद्या पत्रकार परिषद

उद्या (1 डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्या आपली भूमिका करणार स्पष्ट

0

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर)  दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.

उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळले ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया, अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना ‘फिल्म फेअर’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसे होते. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट देऊन रिंगणात उतरवले. ती निवडणूक त्या हरल्या, पण त्यांना मिळालेली मते पाहता, आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.