अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचे त्यांना स्वातंत्र्य
नागपूर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. उर्मिला मातोंडकर आमच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असे शिवसेनेला वाटणे स्वाभाविक आहे, असे त्यांनी सांगितले.
निधी वाटपावरून अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांना विचारले असता, अशोक चव्हाण यांचे भाषण मी ऐकले नाही. पण मध्यंतरी निधी कमी मिळाला होता. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर सर्वांना समान निधी मिळाला, असे सांगतानाच सरकारमध्ये कोणतीही कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याबाबत आम्ही प्रयत्न करतोय. पण ही लढाई श्रेयवादाची केली. लोकल सुरू करण्यासाठी आम्ही पत्र दिल्यावर रेल्वेने पत्र दिले. त्यावर चर्चा करुन मार्ग काढू, लवकरच लोकल सर्वांसाठी सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.