केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू
श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधनावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त
बेंगळुरू : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला कर्नाटकात भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या नाईक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करून गोव्यात नाईक यांच्यावर योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचना मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना केली. पुढील उपचारासाठी नाईक यांना गोव्याला हलविले आहे.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील एका गावाजवळ श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला. या घटनेत श्रीपाद नाईक जखमी झाले. तर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक हे पत्नीसह येल्लापूरहून गोकर्णाला चालले होते. कारमध्ये नाईक यांच्यासह एकूण चार जण होते. या भीषण अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह नाईक यांच्या स्वीय सहायकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तरा कन्नडा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी दिली. जखमी झालेल्या नाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांना योग्य उपचार द्यावेत, यासाठी पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला. श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याला हलविले आहे. दरम्यान, श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधनावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावे, असेही त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले.