अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त, ‘ईडी’ची कारवाई
'ईडी'ने जप्तीच्या संपत्तीत सिनेमागृह, दोन बंगले, हॉटेल, फार्म हाऊसवर टाच
मुंबई : ईडीने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांच्या सात मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 22.42 कोटी एवढी आहे. ‘ईडी’ने आज मोठी कारवाई केली. पीएमएलए कायद्यांर्तगत ही कारवाई करण्यात आली.
‘ईडी’ने जप्त केलेल्या या संपत्तीत एक सिनेमागृह, हॉटेल, निर्माणाधीन हॉटेल, एक फार्महाऊस, दोन बंगले आणि पाचगणीतील 3.5 एकरच्या जमिनीचा समावेश आहे. यापूर्वी ‘ईडी’ने इक्बाल मिर्चीची 776 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यात 203 कोटींच्या विदेशातील संपत्तीचाही समावेश होता. त्यामुळे आता इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांची एकूण 798 कोटीची जप्त झाली आहे. ईडीने 26 सप्टेंबर 2019 रोजी इक्बाल मिर्ची आणि इतरांची पीएमएलए अंतर्गत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूँ मर्चंटसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयात 9 डिसेंबर 2019 रोजी एक तक्रार दाखल केली होती. त्याची न्यायालयाने दखल घेतली होती. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात सहभागी असल्याप्रकरणी इक्बाल मिर्चीचे दोन्ही मुले, आसिफ मेमन, जुनैद मेम आणि पत्नी हाजरा मेमनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.