मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे यांनी फिरवली पाठ

आजच्या महत्त्वाच्या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले येणार नसल्याची माहिती

0

मुंबई : मराठा समाजाच्या तसेच राजकीय वर्तुळात माथाडी भवनात आज होणाऱ्या बैठकांकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. कारण उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण आजच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे बोलावलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीकडे उदयनराजे यांनी पाठ फिरवली आहे.  इतकेच नाही तर लवकरच मराठ्यांच्या राजधानीतून मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार असून साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीचे स्वतः उदयनराजे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खरेतर, मराठा आरक्षणाला  सर्वोच्च न्यायालयात स्थिगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशात राज्यात होणारी एमपीएससी परीक्षेला तूर्तास स्थगिती द्यावी आणि पोलिस भरतीदेखील थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. या मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. बुधवारी नवी मुंबईत माथाडी समाजाची बैठक होणार आहे. या बेठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या बैठकीकडे होते. पण आता उदयनराजे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, एकीकडे उदयनराजे भोसले हे बैठकीसाठी येणार नसल्याची माहिती असतानाच उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचा दावा नरेंद्र पाटील यांनी केला आहे. उदयनराजे भोसले सध्या पुण्यामध्ये आहेत. नवी मुंबईला पोहोचायला दीड तास लागतो. दोन्ही राजे उपस्थित असल्यावर बैठक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर मराठा समाजासाठी दोन्ही राजे एकत्र येतील, असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकाच मंचावर हे दोघे उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबईमध्ये होणारी बैठक मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती. दोन्ही राजेंनी जर एकत्र निर्णय घेतला तर तो निर्णय मराठा समाजासाठी शेवटचा असतो. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गती मिळेल, असा दावा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला होता. पण आता उदयनराजेंच्या अनुपस्थितीतच बैठक पार पडणार असल्याने या काय निर्णय घेण्यात येतो हे  महत्त्वाचे आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.