तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती

धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे सर्वपरिचित

0

मुंबई : अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच बदली करण्यात आलेले मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून  सर्वपरिचित आहेत. त्यांचे धाडसी निर्णय आणि कार्यशैलीमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. पाच महिन्यांपूर्वीच त्यांची नागपूरच्या पालिका आयुक्तपदावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण पाच महिनेही पूर्ण होत नाहीत, तोच पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्यासह आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याचदिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचे निलंबन केले. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचे व्हीआयपी दर्शन बंद केले.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली. पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.