आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, शेतकऱ्यांनी मदतीसाठी किती वाट पाहायची?

बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसंदर्भात होणार होती चर्चा, आता शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

0

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पण गुरुवार पाठोपाठ आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर पाहणी दौऱ्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्वासन महसूलमंत्री थोरात यांनी दिले होते. पण गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ही बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार, असे सांगण्यात आले. पण आज होणारी मंत्रिमंडळ बैठकही आता आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  अशा स्थितीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ताप आल्याने ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित राहू शकत नसल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.  दरम्यान, अजित पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा काल सुरू होती. पण आता ही बैठकच आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी अजून आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.