आज 74 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिला देशाला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' मोठ्या घोषणा, राष्ट्रांबद्दलच्या धोरणांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य

0

नवी दिल्ली : आज देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून देशाला संदेश दिला. आपल्या 86 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचे धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या भाषणात त्यांनी काही मोठ्या घोषणाही केल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ सुरू होणार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधे दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे. पंतप्रधान म्हणाले, वर्ष 2014 च्या आधी देशात केवळ 60 पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडलेल्या होत्या. मागील पाच वर्षांत देशात जवळपास दीड लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या. येत्या 1000 दिवसांत देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडले जाईल.
कोरोनावरील लसीच्या संदर्भात ते म्हणाले, कोरोनावरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. जेव्हा वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा वेगाने उत्पादन होऊन ते जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या याचा आराखडा तयार आहे. देशातील 100 शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एका समग्र दृष्टिकोनासह एका विशेष अभियानवर काम सुरू असल्याचे देखील मोदी म्हणाले.
जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीनं पावले टाकली जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात सुरू आहे. लवकरच तिथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असे मोदी म्हणाले. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी सातव्यांदा संबोधन केले. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत यंदा स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडत आहे. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांऐवजी 500 NCC कॅडेट सहभागी झाले.
मुले 20-25 वर्षाची झाली की, कुटुंबातील मोठे पण सांगतात. आता आपल्या पायावर उभा राहा. आत्मनिर्भर हो. आपल्या देशाला आणि आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतर तसेच ‘आत्मनिर्भर’ व्हायची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आम्ही कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आणि त्यांच्याकडून तयार वस्तू पुन्हा विकत घेणार. हे कधीपर्यंत चालत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल, असे देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.