संविधानाच्या रक्षणासाठी… पुन्हा लढा देण्याची वेळ

महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांचे प्रतिपादन

0

मुंबई   : आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रुजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणाऱ्या ऑगस्ट क्रांती लढ्याला आज ७८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, आ. भाई जगताप, आ. झिशान सिद्दिकी, माजी आमदार मधु चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले की, १९४२ रोजी आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘अंग्रेजो चले जाआे, भारत छोडो’चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म, प्रांत विसरून देशातील लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले व देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रुजवली व वाढवली. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४२ च्या लढ्याला विरोध केला, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून या देशातील लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सत्ता व पैशाचा वापर करून विविध राज्यांतील विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर विरोधी पक्षांना संपवण्यासाठी केला जात आहे. जाती, धर्माच्या आधारे देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा १९४२च्या लढ्याप्रमाणे लढा उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे थोरात म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.