पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी

0

नवी दिल्ली : भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या  चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर , पुण्यातून संग्राम देशमुख , नागपुरातून संदीप जोशी आणि अमरावतीतून नितीन धांडे  यांना भाजपने तिकीट दिले आहे.

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील चार, तर उत्तर प्रदेशातील नऊ जागांवर भाजपने उमेदवार घोषित केले. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत. “मतदार चांगल्या पद्धतीचे मतदान करतील. मागील निवडणुकीची परिस्थितीत वेगळी होती. यावेळी परिस्थिती चांगली आहे. 2014 आणि 2020 च्या परिस्थितीत फरक आहे” अशी प्रतिक्रिया शिरीष बोराळकर यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर दिली. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. “नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सहा महिन्यांपासून काम सुरु होते. भाजपचा गड कायम राखण्याचा प्रयत्न राहील” अशी ग्वाही  संदीप जोशी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

पुण्यात कोणाकोणात सामना? : संग्राम देशमुख (भाजप) विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) विरुद्ध अभिजीत बिचुकले.

नागपुरातून रिंगणात कोण? :  अभिजित वंजारी (काँग्रेस) विरुद्ध संदीप जोशी (भाजप)

पुण्यातून कोण होते शर्यतीत?

पुणे पदवीधर मतदारसंघातून मराठा उमेदवार दिला जाण्याची चर्चा होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळल्याने मोहोळ यांना महापालिकेतून विधिमंडळात पाठवून बक्षिसी दिली जाऊ शकते, असे बोललं जायचे. माजी राज्यमंत्री बाळा उर्फ रवींद्र भेगडे यांनाही पुण्यातून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा तब्बल 94 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे भेगडेंच्या पुनर्वसनासाठी त्यांना विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता होती. याशिवाय अभाविपचे राजेश पांडे यांचे नावही पुणे मतदारसंघातून भाजपतर्फे शर्यतीत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.