वादळी वाऱ्यामुळे हाेडी उलटून तीन जणांचा बुडून मृत्यू, दोन जण बचावले
शेतातून घरी परतताना खळवट लिमगावच्या नदीत हाेडी उलटून घडली घटना
बीड : . वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेतातील काम आटोपून पाच जण हाेडीद्वारे नदी पार करत होते. अचानक वादळी वाऱ्यामुळे हाेडी उलटून तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. अन्य दोघांचे प्राण वाचले. वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे ही घडली.
खळवट लिमगाव येथे गुरुवारी सायंकाळी शेतकरी भारत फरताडे (३४) त्यांची पत्नी सुषमा भारत फरताडे (३२) मुलगा आर्यन (८), सासू अंकिताबाई नाईकवाडे (५७) व भाची पूजा राजाभाऊ काळे (१०) हे शेतीतील काम उरकून गावाच्या जवळील नदीत होडीत बसून गावाकडे निघाले हाेते. सायंकाळी साडेसहा वाजता अचानक जोरदार वारे सुटले. नदीत वाऱ्याने अचानक पाण्याची मोठी लाट उसळल्याने होडी उलटली. यात सुषमा, आर्यन व पूजा यांचा बुडून मृत्यू झाला. माजलगाव धरणातील विसर्ग लिमगावच्या नदीत आल्याने येथील शेतकऱ्यांना होडीद्वारेच नदी ओलांडावी लागत आहे. पूर्वी या नदीवर पूल होता. मात्र काही दिवसांपूर्वी पूल वाहून गेल्याने पुन्हा त्या पुलाच्या दुरुस्तीकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. या नदीवर पूल असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांचा शाेध सुरू हाेता.