धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर तीन कोटी खर्च?; मुंडे म्हणतात…

राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये खर्च

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण धनंजय मुंडे यांनी त्याबाबतचे वृत्त फेटाळले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करून त्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. “काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातम्या येत आहे. त्यात मला मिळालेल्या ‘चित्रकूट’ या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही,” असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

90 कोटी कुठून आले?: बावनकुळे

राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर करण्यात आलेल्या खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याचे सांगता, मग मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी 90 कोटी कसे आले? मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी कुठून आले?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

कंत्राटदारधार्जिणे सरकार : दरेकर

तर, बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च या बंगल्यांवर करण्यात आला आहे. जलसंपदा विभाग, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. आरोग्य विभागावर जी तरतूद आहे. त्यात 50 टक्केही खर्च करण्यात आलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत कशावर खर्च करायचा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचे भान असायला पाहिजे. पण कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे या सरकारचे लक्ष असून हे सरकार कंत्राटदार धार्जिणे झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. बंगल्यावर किती खर्च? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘वर्षा’ बंगल्यावर 3 कोटी 26 लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 1 कोटी 78 लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 33 लाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी 26 लाख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगल्यावर 1 कोटी 46 लाख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या ‘चित्रकूट’ बंगल्यावर 3 कोटी 89 लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या ‘शिवनेरी’ बंगल्यावर 1 कोटी 44 लाख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘रामटेक’ बंगल्यावर 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या ‘बी3’ या बंगल्यावर 1 कोटी 40 लाख, नितीन राऊत यांच्या ‘पर्णकुटी’वर 1 कोटी 22 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘अग्रदूत’ आणि ‘नंदनवन’ या दोन्ही बंगल्यांवर दोन कोटी 80 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.