भीमा-कोरेगावमध्ये चोख पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही, ड्रोन कॅमे-याव्दारे ठेवणार नजर
भीमा-कोरेगाव युद्धाला आज २०१ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे ५ लाखांपेक्षा जास्त लोक जमा झाले आहेत. त्या अनुषंगाने भीमा-कोरेगावात तब्बल ७ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
तसेच ड्रोन, सीसीटीव्ही कॅमे-यांनी नजरही राहणार आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी भीमा-कोरेगावात दंगल उसळली होती. त्याचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावर्षी अशी कोणतीही घटना घडू नये, म्हणून आज येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून तात्पुरती इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी छुपे कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमे-यांव्दारे नजर ठेवली जाणार आहेत. याठिकाणी तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेरे, ११ ड्रोन कॅमेरे तसेच ४० व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत. भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासून येत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंद राज आंबेडकर सभेला संबोधित करणार आहेत.