‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर्स, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर्सची यादी जाहीर
मुंबई : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 मध्ये देशातील सर्वाधिक दुचांकींच्या विक्रीमध्ये ‘हिरो मोटोकॉर्प’ने पहिल्या दहा दुचाकी वाहनांच्या यादीत स्वतःचा दबदबा कायम ठेवला आहे.
या दुचाकी उत्पादक कंपनीची एंट्री-लेव्हल प्रवासी मोटारसायकल स्प्लेंडर या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत टॉपला आहे. तर देशातील सर्वोत्तम स्कूटर होंडा अॅक्टिव्हा दुसर्या स्थानावर आहे.जानेवारी 2021 मध्ये हिरो स्प्लेंडर कॉम्प्युटर मोटरसायकलच्या 2,25,382 युनिट्स दुचाकींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हिरोने 2,22,572 युनिट्स स्प्लेंडरची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात यंदा 1.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला होंडाने गेल्या महिन्यात अॅक्टिव्हा स्कूटरच्या 2,11,660 युनिट्सची विक्री केली आहे, जी जानेवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 234,749 युनिट्सपेक्षा 9.84 टक्के कमी आहे.
एचएफ डीलक्सच्या विक्रीत घट, तरीही तिसरे स्थान कायम
टू व्हीलर सेगमेंट कोरोना साथीच्या रोगाच्या प्रभावातून बाहेर पडत असताना, एंट्री लेव्हल सब सेगमेंटने दुचाकींच्या विक्रीत टॉपचे स्थान मिळवले आहे. हिरो मोटोकॉर्पच्या कॉम्प्युटर मोटरसायकल, HF डीलक्सने गेल्या महिन्यात 1,34,860 युनिट्सच्या विक्रीसह देशात तिसरे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात HF डीलक्सच्या 1,91,875 युनिट्सची विक्री झाली होती. या विक्रीत यंदा 29.71 टक्के इतकी घट झाली आहे.
बजाज पल्सर चौथ्या स्थानी
जानेवारी 2021 मध्ये टॉप 10 दुचाकी वाहनांच्या यादीमध्ये बजाज पल्सर, होंडा सीबी शाईन, अॅक्सेस, टीव्हीएस एक्सएल सुपर, सीटी, रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि ग्लॅमरचा समावेश आहे. या दुचाकींचा अनुक्रमे चौथा ते 10 वा क्रमांक लागतो. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 हे 500 सीसी मॉडेल हे या प्रकारातील सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल आहे. मागील महिन्यात रॉयल एनफील्डच्या 40,875 युनिट्सची विक्री झाली असून जानेवारी 2020 मध्ये 40,834 युनिट्सच्या तुलनेत 0.10 टक्के वाढ झाली आहे.
रॉयल एनफिल्डचे स्थान कायम
जानेवारी 2021 मध्ये टॉप 10 दुचाकी वाहनांची विक्री 10,26,175 युनिट्स इतकी नोंदवण्यात आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 9,82,035 युनिट्स इतकी होती. म्हणजेच त्यामध्ये 4.49. टक्के वाढ नोंदवली गेली. टॉप 10 दुचाकींच्या यादीत हिरो मोटोकॉर्पने 39.31 टक्के मार्केट शेअरसह तीन जागा मिळवल्या आहेत. आता, स्कूटर आणि प्रीमियम मोटारसायकल प्रकारात त्यांनी अधिक लक्ष घातलं आहे. हार्ले डेव्हिडसनसोबत भागीदारी केल्यानंतर आता हिरोच्या विक्रीत आणखी वाढ होईल, असे बोलले जात आहे.