राज्यात पदवीधर निवडणुकीनंतर सत्तापालट होणार – प्रवीण दरेकर

ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी

0

जालना : राज्यात पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट होणार असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला जनता एका वर्षातच वैतागली आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परतूर (जि. जालना) येथे आयोजित मेळाव्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारमुळे त्रस्त आहे. महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीत पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचे सरकार नकोय हे स्पष्ट होईल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणूक आणि देशातील काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सुशिक्षित तरुणांना भाजपला पसंती दिल्याचे दिसले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसेल, असा दावा दरेकर यांनी केला

ठाकरे सरकार अस्थिर…

प्रवीण दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे. त्यामुळे राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना वाढीव वीजबिल देऊन सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. सरकार लबाड आहे. वाढीव वीजबिल माफ करण्याचा शब्द पाळला नाही.

देवेद्र फडवीसांनी फेटाळले ‘ते’ वृत्त…

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळले आहे. भारतीय जनता पार्टी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेच्या वीज दरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेसोबत युती होऊ शकते, असे सांगून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा घडवून आणली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप-मनसे युतीचे मोठे आव्हान राहणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.