‘बिचुकलेंची मतदारयादीसाठी नावनोंदणी नाही, आरोपात तथ्य नाही’, जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत अभिजीत बिचुकलेंच्या आरोपांवर केला खुलासा
सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी पदवीधर मतदारयादीत नावनोंदणी केली नाही. त्यामुळे त्यांचे मतदारयादीत नाव आले नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत खुलासा केला आहे अभिजीत बिचुकले यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मतदार नोंदणी अर्जांची पडताळणी केली. यामध्ये बिचुकलेंनी नावनोंदणी केले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. “अभिजित बिचुकले यांच्याकडे नावनोंदणीचा कोणताही पुरावा नाही”, असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे बिचुकले यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बिचुकले आज (1 डिसेंबर) सकाळी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. त्यावेळी मतदारयादीत त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते. मात्र त्यांच्या नावाखाली अभिजीत बिचुकलेंचे नाव नसून नारायण बिचुकले, असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. यानंतर अभिजीत बिचुकले यांनी मतदान यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथवर गोंधळ घातला. या सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजपवर फोडले.