प्रियकराच्या हौसेखातर प्रेयेसीची नातेवाईकांच्याच घरी चोरी
नातेवाईकांच्याच घरी चोरीची नाशिकमधील धक्कादायक घटना
नाशिक : प्रियकराची हौस भागवण्यासाठी एका अल्पवयीने मुलीने नातेवाईकांच्याच घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नातेवाईकांच्या घरी आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी प्रेयसीने घरातील दागिन्यांवर डल्ला मारला.
जानकी या नाशिकच्या पाटीदार भवन या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी त्यांनी नातेवाईकांनीदेखील आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात जानकी नागपाल यांची 16 वर्षीय नणंद आपल्या आजीसह सहभागी झाली. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर जानकी यांची नणंद आणि आजी रात्रभर मुक्कामी थांबले. यावेळी मध्यरात्री सर्व झोपले असताना नणंदने म्हणजेच अल्पवयीन प्रेयसीने लाखो रुपयांचे दागिने आणि 26 हजार रुपयांची रोख रकमेची चोरी केली. तिने घरी जाताना आपल्या प्रियकाच्या ताब्यात दागिने आणि पैसे दिले. काही तासांनी नागपाल कुटुंबाला आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेतली. जानकी नागपाल या महिलेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरीचा छडा लावत प्रियकर आणि प्रेयेसीला बेड्या ठोकल्या.याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी प्रेमीयुगुलास अटक केली. दरम्यान, प्रियकराची हौस भागविण्यासाठी करण्यात आलेल्या या चोरीच्या घटनेची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली.