जिवावर उदार अन् कोरोना रुग्णालयात चोरी, पोलिसही आश्चर्यचकीत

दिंडोशी येथे कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करणाऱ्या चोर अटकेत

0

मुंबई : मुंबई उपनगरातील दिंडोशी येथे चोरीचा एक अजबच प्रकार घडला.  जिवैवर उदार होऊन कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अटक केली. हा चोर कोरोना रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचा. त्यांच्या बॅगमधून पैसे आणि मोबाईल चोरायचा. या अट्टल चोराचे नाव आसिफ इद्रिस पठाण असून त्याच्या अजब धाडसामुळे पोलिसही अवाक झाले . आरोपी आसिफला  दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाला नागरिक अजूनही घाबरतात. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात यायचे टाळतात. असे असतानाही आसिफ हा चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन चोरी करायचा. आसिफ इद्रिस पठाण हा कोरोना रुग्णांना भेटायला, रुग्णांचा काळजी घ्यायला आलेल्या नातेवाईकांना लुटायचा. रुग्णालयात रात्री जाऊन झोपलेल्या नातेवाईकांचे पैसे, बॅग, मोबाईल चोरी करायचा. दिंडोशी पोलिस ठाण्यात 5 ऑक्टोबरला कोरोना रुग्णालयातून चोरी झाल्याचा पहिला गुन्हा नोंद झाला. तक्रारदाराचे वडील आजारी असल्याने त्यांना दिंडोशीतील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांना कधी तातडीची मदत लागते, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्याची मुभा आहे. हे नातवाईक रात्री रुग्णालयाच्या आवारातच झोपतात. याच गोष्टीचा फायदा घेत आसिफ रुग्णांच्या नातेवाईकांचे पैसे, बॅग, मोबाईल चोरायचा. त्याची चोरी करायची पद्धतही अजबच होती. त्याच्या चोरीची पद्धत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आसिफच्या चोरीचे व्हिडिओ धक्कादायक आहेत. आसिफच्या चोऱ्यांमुळे रुग्णालय प्रशासन आणि कोरोना रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले होते. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दिंडोशी पोलिस तसेच  मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोऱ्यांचा छडा लावण्यात आला. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल आव्हाड, पोलिस नाईक अमोल राणे यांनी तपास सुरू केला. तपास करण्यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यात त्यांना रुग्णालयाच्या आवारातून एका रिक्षाने आरोपी पळून गेल्याच् समजले. त्यावरून पोलिसांना आरोपी आसिफचा सुगावा लागला. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी सुमारे 100 पेक्षाही जास्त सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. अखेर अंधेरी परिसरातून आसिफ इद्रिस पठाणला मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आसिफ इद्रिस हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आतापर्यंत दोन रिक्षा आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्याची चौकशी सुरू असून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता दिंडोशी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.