खलनायकही असावा ताकदीचा, भाजपने विरोधी पक्षाची भूमिका वठवली उत्तम : संजय राऊत
महाराष्ट्रातील सरकारचे 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भक्कमपणे भूमिका पार पाडावी
मुंबई : मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकास आघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रे उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाविकास आघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रे उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील सरकारचे 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणे बंद करावे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरे खोटे नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्षे विरोधी पक्ष म्हणून असेच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘सुधीर मुनगंटीवारांच्या विनोदी कार्यक्रमांना मोठी गर्दी होईल’
पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे, असा सूचक इशारा देणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. तीन महिन्यांत सरकार पडेल, हा सुधीरभाऊंचा विनोद चांगला होता. राज्यातील प्रमुख नाट्यनिर्माते आम्हाला फोन करतात. काही सवलत देण्याची मागणी करतात. मात्र, त्याची काही गरज नाही. सुधीर मुनगंटीवार यांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर तुफान गर्दी होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
‘देवेंद्र फडणवीसांना ‘सामना’ वाचायची सवय लागली, हे उत्तमच’
‘सामना’त अग्रलेख लिहला गेला म्हणजे घाव वर्मी बसला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस ‘सामना’ वाचतात ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना जगात काय सुरू आहे, हे कळेल. देवेंद्रजींनी ‘सामना’ वाचायची सवय लागली असेल तर कौतुक आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?
राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचेच आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणे आणि टिकवणे ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढते, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यांत पडेल. तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणे आणि टिकवणे ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरोंसे डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.