‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’चा सातवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
11 वाजता तुमच्या खात्यात पैसे, पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे लक्ष
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात येत्या काही तासांतच वर्ग करणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी 2000 रुपयांच्या स्वरूपात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट जमा केले जातात. आपण या योजनेचे लाभार्थी असल्यास आपण घरी बसून खात्यातील रक्कम आली की नाही तपासू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम वर्ग केली जाते. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे. सातव्या हप्त्याचा लाभसुद्धा 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकर्यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत, कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्डची माहिती उपलब्ध नाही. तर काहींच्या नावामध्ये गडबड असल्याने पैसेदेखील थांबवण्यात आलेले आहेत.
आपल्या खात्यात पैसे आले का हे कसे तपासणार? : पीएम किसान सम्मान निधीअंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
तुम्हाला सर्वांत आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सम्मान निधीचे होमपेज दिसेल.
होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.
मंत्रालयाशी संपर्क साधण्याचीही सुविधा :
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
पंतप्रधान किसन यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606
पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109
ईमेल आयडी: [email protected]
नवीन शेतकर्यांची नोंदणी कशी करावी ?
जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी नोंदणी केली नसेल तर आताही नोंदणी करून तुम्हाला फायदा मिळवता येऊ शकेल. सर्व प्रथम, आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटवर जावे लागेल. ज्यामध्ये शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल. नवीन शेतकरी नोंदणी टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आधार कार्डचा तपशील भरावा लागेल. ते भरून झाल्यानंतर दुसरे पान तुमच्यासमोर उघडेल, जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर तुमची माहिती येईल आणि तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर असे लिहिलेले येईल की, तुम्हाला पंतप्रधान किसान पोर्टलवर नोंदणी करायची आहे का? यावर आपल्याला होय करावे लागेल. यानंतर फॉर्म दिसेल जो भरावा लागेल. त्यामध्ये योग्य माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा. यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्यास आपल्या जमिनीच्या सातबाराचा तपशील विचारला जाईल. विशेषत: सातबारावरील गट क्रमांक आणि खाते क्रमांक भरावे लागणार आहे. आपण जतन करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.