पत्रकारांकडूनच आरोग्य विभागाचे होते खरे परीक्षण – डॉ.एकनाथ माले
उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा; मोहन व्हावळे, संभाजी मुंडे यांची मागणी
परळी : आरोग्य विभागाचे खरे परीक्षण हे पत्रकारच करू शकतात. आरोग्य विभागाचे चांगल्या कामाचे कौतुक करा तसेच आमच्या कमतरतासुद्धा आपल्या लिखाणातून आम्हाला दाखवून द्या, आम्ही त्यात निश्चित सुधारणा घडवून आणू असे आश्वासन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी दिले.
आरोग्य विभागाचे चांगल्या कामाचे कौतुक करा तसेच आमच्या कमतरतासुद्धा आपल्या लिखाणातून आम्हाला दाखवून द्या, आम्ही त्यात निश्चित सुधारणा घडवून आणू असे आश्वासन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी दिले. उपजिल्हा रुग्णालयात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. “रिपोर्टर ऑफ द इअर” पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक मोहन व्हावळे व पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे यांनी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे परळी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली. त्याच बरोबर आरोग्याच्या संबंधीत अनेक प्रश्नांबाबत प्रशासनाला अवगत करण्यात आले.
कोरोना काळात केलेले सर्वांगसुंदर वार्तांकन लक्षात घेता दर्पण दिनानिमित्त दत्तात्रय काळे यांना या वर्षीचा रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्कार बहाल करण्यात आला. आज दि.08 जानेवारी रोजी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश कुर्मे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, डॉ.अर्षद शेख, डॉ.घुगे, डॉ.कराड, डॉ.ढाकणे, डॉ.केंद्रे, डॉ.तिडके, डॉ.घुगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक मोहन व्हावळे, पत्रकार जगदीश शिंदे, कैलास डुमणे, महादेव गित्ते आदींची उपस्थिती होती.