संरक्षणमंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, सुजय विखेंची टोलेबाजी

नगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

0

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील रस्त्यांमुळे केवळ नगर जिल्ह्यातील लोकच त्रस्त नाहीत. तर खुद्द भाजपचे खासदार सुजय विखे-पाटीलही त्रस्त झाले आहेत. नगरमधील रस्त्याशी निगडित प्रत्येक कामे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्याने आता संरक्षण मंत्री झाल्याशिवाय नगरचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी मिश्किल कोटीच सुजय विखे-पाटील यांनी केली.

नगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरण आणि नूतनीकरणाच्या कामाचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी हे मिश्किल भाष्य केले. आपल्या जिल्ह्यात संरक्षण खात्याशी संबंधित कामे सर्वाधिक आहेत. प्रत्येक रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परनागी लागते. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी संबंधित आहे. त्यामुळे संरक्षणमंत्री झाल्याशिवाय आपल्या जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मिश्किल भाष्य सुजय यांनी करताच  हशाची एकच खसखस पिकली. येथील चार पदरी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचा प्रस्ताव नॅशनल हायवेकडे पडून आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन कामाला सुरुवातही करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राजकारणातील दांभिकतेवरही प्रहार केले. सध्या राजकारणात खोटं बोलण्याचे धंदे जोरात सुरू असल्याचे सांगताना त्यांनी एक गोष्टही सांगितली. एखादी व्यक्ती डॉक्टरकडे जाते. तेव्हा डॉक्टर त्याला थोडं फ्रॅक्चर सारखे वाटत असेल तर व्यायाम करण्याचा सल्ला देतो. पण त्या व्यक्तीला तो सल्ला पटत नाही. मग तो पुढच्या डॉक्टरकडे जातो. तेव्हा दुसरा डॉक्टर त्याला क्रॅक्शन लावून बरे होईल म्हणून सांगतो. त्या व्यक्तीला या डॉक्टरचाही सल्ला पटत नाही. मग तो आणखी तिसऱ्या डॉक्टरकडे जातो. हा डॉक्टर मात्र त्याला तुम्ही एक महिना उशिरा आला असतात तर गडबड झाली असती, असे सांगत ऑपरेशन करण्याचा सल्ला देतो. त्यावेळी त्या माणसाला मात्र हा डॉक्टर खरा असल्याचा साक्षात्कार होतो. राजकारणातही हेच धंदे सुरू आहेत. खोटे बोला, पण रेटून बोला असे सुरू आहे. केंद्रात जे होते ते आमच्यामुळे होते. राज्यात जे होते ते आमच्यामुळे होते, असे दावे केले जातात. मग आम्ही काय चने-फुटाणे खाण्यासाठी खासदार झालो आहोत काय?, असा सवाल करतानाच खोटे बोलणे हा आपला पिंड नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.