‘भाजप’चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात खलबते

....त्यांच्या एका निर्णयामुळे राजकीय पटलावर मोठे वादळ येण्याची शक्यता

0

मुंबई : भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच खलबते सुरू असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळे राजकीय पटलावर मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपमध्ये बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचे म्हटले जात आहे.  सध्याच्या घडीला जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती  आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली. इतकेच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सूर आळवल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे ते अखेर पक्षातून काढता पाय घेणार का, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. जवळपास ४५ वर्षांंहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळे नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेने जोर धरला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.