माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर डागली तोफ

शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांचे प्रेम बेगडी, शेतकरी तुमच्याकडे नाही वळणार

0

जालना  :  शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत आहेत. त्यांचा कोणीही एकेरी उल्लेख करून संकटात राजकारण करू नये. तुम्ही शेतकऱ्यांना साले म्हणता. त्यामुळे तुमचे शेतकरी प्रेम बेगडी आहे. शेतकरी तुमच्याकडे वळणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतानाच दानवेंच्या पैठण येथील वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

 काल पैठण येथील जाहीर सभेत  मुख्यमंत्र्यांना घरात बसून कोरोना होईल का..? असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते.  त्यांच्या वक्तव्यामुळे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी चांगलेच धाारेवर धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्य करत आहेत. अशा परिस्थितीत भाजपने घाणेरडे राजकारण करू नये. राज्यात ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्ज मुक्ती मिळाली. कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीवर यशस्वीपणे मात करून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून नाहीत तर प्रत्यक्ष काम करत आहेत. एवढ्यावरच न थांबता उद्यापासून राज्याचा दौरा करून पाहणी करण्यासाठी बांधावर जात आहेत. मंत्री अब्दुल सत्तार हे उद्या जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येत आहेत, असे सांगून अर्जुन खोतकर म्हणाले, कृषिमंत्र्यांसह सर्व पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात पाहणी करून आलेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने गळे फाडणारे त्यांच्या मतदारसंघात तरी गेलेत का, असा सवालही खोतकर यांनी केला. भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय झाली असून संकटकाळात राजकारण न करता सर्वपक्षीयांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे वातावरण निर्माण करायला हवे, अशी अपेक्षाही खोतकर यांनी व्यक्त केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.