क्वॉरंटाइन सेंटरमधील जेवणातील अळ्यांची वळवळ फक्त प्रयाेगशाळेपर्यंतच

धान्य तपासणी अहवाल रखडल्याने उलटसुलट चर्चा, प्रशासन : अहवाल प्राप्त नंतरच निर्णय

0

हिंगोली  :  अंधारवाडी येथील क्वाॅरंटाइन सेंटरमध्ये जेवणात अळ्या निघाल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धान्याचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले. मात्र एक महिना उलटूनही त्या तपासणीचा अहवालच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नेमका अहवालासाठी लागणारा उशीर संशोधनाचा विषय बनला आहे. तर दुसरीकडे अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढील कारवाई होणार नाही, असे सांगून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले.

हिंगोली शहराजवळच अंधारवाडी येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे. काेविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना या विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या संशयित रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून केली आहे. त्याचे कंत्राटही दिले आहे. मात्र या ठिकाणी ६ सप्टेंबर रोजी जेवणामध्ये अळ्या निघाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. या प्रकरणानंतर परभणीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे आल्यानंतर संबंधित कंत्राटदारांच्या गोदामावर जाऊन धान्याचे नमुने तपासणीला घेतले. यामध्ये तांदूळ, डाळ, पीठ व तेलाचा समावेश आहे. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठवले. मात्र अद्यापही या नमुन्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. धान्य नमुने तपासणीला पाठवून महिना उलटूनही अद्याप अहवाल का प्राप्त झाला नाही, हा चर्चेचा विषय बनला आहे. हिंगोली जिल्ह्यातील काेविड सेंटरमधील जेवणात अळ्या निघाल्या प्रकरणात कंत्राटदाराच्या गोदामावर जाऊन धान्य नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. आम्ही केवळ नमुने पाठवतो, अहवाल पाठवण्याचे काम प्रयोगशाळेचे आहे. त्या ठिकाणावरून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. नारायण सरकटे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, परभणी यांनी सांगितले. जेवणात अळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने त्या ठेकेदाराकडील भोजन पुरवठ्याचे कंत्राट काढून घेतले. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई न झााल्याने हे प्रकरण मॅनेज झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.