भालगावजवळ गाडी खराब झाल्याने बिल्डरला रस्त्यात सोडून अपहरणकर्ते फरार

शहरातील देवीनगरी येथून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण प्रकरणाला आता नवे वळण

0

औरंगाबाद : शहरातील देवीनगरी बुधवारी सकाळी झालेल्या बांधकाम व्यावसायिक अपहरण प्रकरणाला आता नवे वळण लागले. अपहरण झालेले नाझीम पठाण राउफ पठाण हे औरंगाबादेतून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या भालगावजवळ जखमी अवस्थेत सापडले. विशेष म्हणजे अज्ञात अपहरणकर्ते खराब झालेली गाडी रस्त्यावर सोडून फरार झाले आहेत.

जखमी अवस्थेत बांधकाम व्यावसायिक नाझीम पठाण राउफ पठाण यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपहरणकर्त्यांनी नाझीन पठाण यांच्या पायवर गोळी मारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप याबाबत पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत बांधकाम व्यावसायिक नाझीम पठाण यांचं बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अपहरण केले होते. शहरातील देवानगरी जवळील पीडब्ल्यूडी कॉलनीत ही घटना घडली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने अपहरणकर्त्याची गाडी खराब झाल्याने त्यांनी नाझीम पठाण यांना जखमी अवस्थेत सोडून अपहरणकर्ते फरार झाले आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांची खराब झालेली गाडी जप्त केली. गाडी कोणाच्या नावावर आहे, याबाबतही पोलिस तपास करत आहेत. बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले होते. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता, हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत असून प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास पोलिस अधिकारी नकार देत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.