आष्टीत बिबट्याच्या हल्ल्यात सुरुडी पंचायत समिती सदस्यांचे पती जागीच ठार

आष्टीच्या सुरुडी गावात पसरली बिबट्याची दहशत, नागरिकांची तात्काळ बंदोबस्ताची मागणी

0

बीड : आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी सुरुडी पंचायत समिती सदस्य गणाच्या सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय 34) हे बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जागीच ठार झाले आहे.

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे मंगळवारी (ता.24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. नागनाथ गर्जे हे मंगळवारी दुपारी सुरुडी येथील त्यांच्या मालकीच्या शेतीतील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अंधार पडण्याची वेळ होऊनही ते घरी न परत आल्याने गावातील काही लोक त्यांना शेतात पाहण्याकरिता गेल्यानंतर नागनाथ गर्जे हे गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत कोसळलेले आढळले. त्यांच्या तोंडावर ओरबाडल्याच्या व चावा घेतल्याने डोके धडासमवेत लोंबकळत असल्याचे आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले. या घटनेची माहिती समजताच वनविभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरुडी व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते. आज घडलेल्या या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले असून यामुळे सुरुडी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांनी शोधमोहीम राबवून तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.