शासकीय कार्यालयांत अँटीजन टेस्ट करूनच मिळणार प्रवेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आणि विभागीय आयुक्तालयाचाही समावेश
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासकीय कार्यालयात गर्दी करणाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, पोलिस आयुक्तालयासह विभागीय आयुक्त कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली, त्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या आताच्या सहा दिवसांत आठशे तर मंगळवारी एका दिवसात तब्बल २४० कोरोना रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपाने पुर्वी प्रमाणेच नियोजन सुरू केले आहेत. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. कालच जिल्हाधिकारी सुनील चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान संचारबंदी लागू केली. त्याची अंमलबजावणी सूरू केली. तसेच मनपाने २४ तपासणी सुविधा, कोविड सेंटर पूर्ववत सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आता शासकीय कार्यालयाबाहेरही कोरोना चाचणी बुधवारपासून सुरू केली. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (सुटीचे दिवस वगळून) मनपाचे पथक कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच थांबणार आहे. टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला तरच कार्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
दुकानांसह सर्वच ठिकाणी नियमांचे पालन
उपाययोजना हाच मोठा प्रर्याय या आजारासाठी असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, दुकानात ऑक्सीमीटर, थर्मलगनचा वापर करणे आदी नियम पाळणे आवश्यक केले आहेत. व्यापाऱ्यांनी दुकानामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तीना प्रवेश देऊ नये, असे आवाहन मनपाने केले आहे.