मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईने नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला!
राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू होण्यासाठी भक्तांना आणखी काहीकाळ करावी लागणार प्रतीक्षा
मुंबई : धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी राज्यात भाजपसह विविध संघटनांनी आंदोलने केलेली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिरे सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेऊ. घाईघाईत कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू होण्यासाठी भक्तांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिरं घाईघाईत सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे. सणासुदीतही हे आवाहन केले होते. सर्व धर्मीयांनी माझं म्हणणे ऐकले. आता दिवाळी आणि नवरात्र येत आहेत. त्यामुळे या काळातही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. तोंडाला मास्क लावणे हे बंधनकारक आहे. इतर सणांप्रमाणेच येणाऱ्या सणांच्यावेळीही सर्वांनीच खबदारी घ्यायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत सध्या आम्ही हळूवारपणे पावले उचलत आहोत. अनेकजण हे सुरू झाले, मग ते का नाही, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी शांत बसावे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. आम्हाला जनतेची काळजी आहे. उगाच तंगड्यात तंगडे घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारांतून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला आहे. ब्रिटनमध्ये तर सहा महिने नियमावली लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त राहू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. दिलेल्या सूचनांचं कटाक्षाने पालन करावे. एक क्षणही गाफील राहू नका आणि कोरोनाचा बळी ठरू नका, असेही ते म्हणाले.