अहमदनगरमध्ये एकावर एक रचलेले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, एकाच रुग्णवाहिकेत

रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्तपणे रचल्याचे उघडकीस; शिवसेना नगरसेवकाकडून व्हिडीओ व्हायरल

0

अहमदनगर : राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारावर भर दिला जात असताना अहमदनगरमध्ये मात्र, कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळाले. पालिकेच्या एकाच रुग्णवाहिकेत 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्तपणे रचल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला आहे. तसेच प्रशासनावर अत्यंत असंवेदनशीलपणाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे.
अहमदनगरमध्ये आज (10 ऑगस्ट) दिवसभरात एकूण 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात 4 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. यानंतर पालिका प्रशासनाकडून या 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी होती. मात्र, पालिका प्रशासनाने अत्यंत बेजबाबदारपणे सर्व 12 मृतदेह एकावर एक रचत एकाच रुग्णवाहिकेत टाकले. अमरधाम येथे गेल्यावरही हे मृतदेह अस्ताव्यस्त टाकून देण्यात आले होते, असा गंभीर आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा भांडाफोड करणारा एक व्हिडीओदेखील शेअर केला. तसेच कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचा आरोप केला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रुग्णवाहिकेत एकावर एक अस्ताव्यस्त रचून ठेवलेले 12 रुग्णांचे मृतदेह दिसत आहेत. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे मत बोराटे यांनी व्यक्त केले. त्यांनी या प्रकरणी जन आक्रोश आंदोलन करणार असल्याचाही इशारा दिला. बाळासाहेब बोराटे यांनी आयुक्तांना दिलेल्या आपल्या पत्रात मृतदेहांसोबतच कोरोना रुग्णांच्या अवहेलनाचाही आरोप केला आहे. ते म्हणाले, “प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही. अशाप्रकारे कोरोना रुग्णांचे मृतदेह अस्ताव्यस्त टाकणे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. प्रशासकीय पातळीवर ज्याप्रकारे योजना होणे अपेक्षित आहे तशा उपाययोजना झालेल्या कोठेही दिसत नाही.” “यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवरही योग्य उपचार होत आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांमध्ये या सर्व व्यवस्थांमध्ये सुधारणा झाली नाही, तर वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाईल. तसेच नगर शिवसेनेकडून जन आक्रोश आंदोलन केले जाईल,” असा इशारा बोराटे यांनी दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.