कडवट शिवसैनिक दुसरे काहीही करेल; पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही : संजय राऊत

राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरताहेत, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी

0

मुंबई :  कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरे काहीही करेल, पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीच घेणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असणाऱ्या सचिन वाझे यांनी पत्र लिहून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतके गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही. विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी आम्ही ते भेदून पुढे जाऊ. निडरपणे लढून सर्व संकटं परतावून लावू, असा विश्सासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘लक्षात ठेवा जेलमधील इतर व्यक्तीही लिहू शकतात पत्र’

विरोधक हे सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडून काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत. अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का, यावर भाजपने स्पष्टीकरण दिले पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्यादेखील पत्र लिहू शकतात, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला.

अनिल परब काय म्हणाले होते?

“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडाओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होते. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असे भाजपला आधीच माहिती होते. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचे नाव घेण्यात आले आहे”, असे परब म्हणाले. त्याचबरोबर ‘माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत, त्याचा माझा संबंध नाही. अशी चौकशी सुरु आहे हे मला माहिती नाही. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असेही परब म्हणाले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.