अखेर नाशिकला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान
शुक्रवारी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा, 24 जानेवारीच्या बैठकीत निवडणार संमेलनाध्यक्ष
नाशिक : नाशिकला 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळणार असल्याचे शुक्रवारी शिक्कमोर्तब केले. स्थळपाहणी समितीने गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यावर शुक्रवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली.
स्थळपाहणी समितीने गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यावर शुक्रवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली. समितीने इतर कोणत्याही ठिकाणाची पाहणी न केल्याने संमेलन नाशिकलाच होणार हे निश्चित झाले होते. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संमेलन होणार आहे. तसेच स्वागताध्यक्षपद पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
24 जानेवारीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष निवडणार
नाशिकला साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच 24 जानेवारीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष निवडणार, असे ठरवण्यात आले आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातच संमेलन घेण्यासाठी साहित्य महामंडळाचा प्रयत्न सुरू होते. संमेलन मार्च महिन्यात 19, 20 आणि 21 रोजी होणार, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मार्च महिन्याचा चौथा आठवडाही संमेलनासाठी विचारात होता. मात्र 28 तारखेला होळी हा सण आल्याने त्याचा विचार मागे पडला.
२७, २८ फेब्रु. १ मार्च का नाही : कुसुमाग्रजांच्या नगरीत संमेलन हाेत आहे. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गाैरव दिन’ म्हणून साजरा केला जाताे. या वर्षी २७ तारीख ही शनिवारीच आलेली आहे. अर्थात सुटीचाच दिवस आहे. त्यामुळे या दिवशी संमेलन घेतले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल आणि कुसुमाग्रजांना ती एक मानवंदना ठरेल, असाही एक विचार यानिमित्ताने पुढे येत आहे.
मंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष : संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांची लुडबुड नकाे हा नियम उस्मानाबाद संमेलनात पाळला हाेता. नाशिकच्या संमेलनाचा मान मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना देण्याच्या विचारात आयाेजक आहेत. यंदा शासनाकडून संमेलनासाठी केवळ पाच लाखांचा निधी मिळणार आहे. भुजबळ स्वागताध्यक्ष झाले तर या निधीत थाेडी वाढ हाेऊ शकते.